Asan Yoga Trip To Aai Bungalow
रोजच्या सारखी सकाळी योगा क्लासला आले. क्लास आटपला आणि गप्पा सुरू झाल्या. बरेच दिवसां पासून कुठेतरी बाहेरगावी मस्त फिरून येऊया, असं सर्वांच्या मनात होतं त्यावर चर्चा सुरू झाली. तेवढ्यात रोहन म्हणाला “कोकणात जाऊया ना..”, “ पण जाणार कुठे?” दुस-याने विचारलं.
कोकणात आता पर्यटन वाढलं आहे. चांगली हॉटेल्स आहेत. ह्यावर सर्वांच अेकमत झालं. “हॉटेलपेक्षा कोकणातल्या घरात रहाता आलं तरच कोकणात गेल्याचा खरा आनन्द !” मी म्हणाले माझ्या बोलण्यावर नितीनने हेदवी येथील “आई बंगल्यात” राहूया, असं सुचवलं कारण त्याच्या ओळखीचं कुणी तिथे राहून आलं होतं आणि “आई बंगल्यात” रहायला त्यांना खूपच आवडलं होतं.
कोकणची तीन दिवस दोन रात्री अशी छोटीशी ट्रिप ठरली आणि आम्ही “आई बंगला” हेदवीचं बुकिंग केलं. हेदवी हे कोकणातल्या गुहागर तालुक्यातलं समुद्र किनारी वसलेले एक छोटसं गाव. मुंबईपासून तीनशे किलोमीटर आणि पुण्यापासून 250 किलोमीटर. हेदवीला जाण्यासाठी गाडी, बस तसेच रेल्वे हे पर्याय आहेत. रेल्वेने गेलं तर चिपळूणला उतरून हेदवी पर्यन्त गाडीने जावं लागतं. रेल्वेने जाणं खूप सोयीचं ठरतं.
आम्ही मु्बईहून रेल्वेने गेलो. चिपळूण स्टेशनला उतरलो आमच्या भाड्याच्या गाड्या आम्ही आधीच बुक केल्या होत्या. गाडीतून आम्ही हेदवीकडे निघालो. गावात शिरतानाच
गावाचं जपलेलं गावपण लक्षात येतं. ड्रायव्हर उत्साही होता. त्याच्या बोलण्यातून समजलं की हेदवीची लोकवस्ती अंदाजे 2500 आहे. गाव छोटा असला तरी दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू गावातच उपलब्ध आहेत.
छोटासा पण छान डांबरी रस्ता लाल मातीतून उठून दिसत होता. क्वचित कुठे गुरं ढोरं चरत होती. छोटी मोठी घरं, मोहोरलेली आंब्याची झाडं न्याहाळत आम्ही “आई बंगल्यात” पोहोचलो. बंगल्याच्या केअर टेकरने दरवाजा उघडला. गाड्या पार्क झाल्या. बंगल्याच्या प्रथम दर्शनानेच माझ्या तोंडून शब्द निघाले “ क्या बात है!”
या नयन रम्य आई बंगल्याविषयी सांगायचं तर असं म्हणता येईल की शहरातील सुखसोईंनी समृद्ध तरीपण गावातल्या घराचं घरपण जपणारी अशी ही वास्तू. श्री चंद्रशेखर जोगळेकर व सौ उल्का जोगळेकर यांच्या संकल्पनेतून मोठ्या मेहनतीने साकारलेलं स्वप्नातलं घर!
चहुबाजूने डोंगर असलेला आणि वनराईत वसलेला हा आई बंगला, हेदवी मधील प्रसिध्द दशभूज गणेश मंदिराच्या जवळ आहे. झाडांच्या कुशीत, पक्ष्यांच्या हळुवार किलबिलाटात तुमचं आपुलकीने स्वागत करत म्हणतोय “ खुशाल या, कोकण आपलंच आहे!”
बंगल्याचा काही भाग घरमालकांनी त्याच्या स्वतःच्या वापरासाठी आरक्षित ठेवला आहे. उर्वरित भाग गेस्ट ना राहण्यासाठी दिला जातो ज्यात चार बेडरूम , एक गेम रूम जिथे टेबल टेनिस, बुध्दीबळ, कॅरम या गोष्टी ठेवलेल्या आहेत यांचा समावेश होतो. या व्यतिरिरिक्त पहिल्या मजल्यावर रूम्सच्या बाहेरच वीस पंचवीस माणसे आरामात बसतील अशी कॉमन गच्ची आहे. ही गच्ची वरून शाकारलेली असल्याने छोटीशी गाण्याची महफ़िल करता यावी अशी आहे. तसेच अंगण आणि मोठी बागही आहेच.
हा बंगला अंदाजे अडीच एकर म्हणजे शंभर गुंठे जमीनीवर केलेली बागायत आणि बाग ज्यात भरपूर प्रकारची झाडं आहेत तिथे सजलेला आहे. प्लॉटला सर्व बाजूंनी दगडी कुंपण आहे आणि पूर्ण वेळ केअरटेकरही आहे.
आम्ही तिथे मस्त धमाल केली. आंगणात बॅडमिंटन खेळलो, गच्चित गाणी म्हटली, नाचलो. निसर्गाच्या सान्निध्यात योगासनं तसंच मेडिटेशन केलं. स्वच्छ सुन्दर समुद्र किनारा पाहून तर हरवून गेलो. समु्द्राच्या वाळूत, लाटांच पाणी उडवत भिजलो, धावलो. सूर्यास्ताचे मोहक रंग मनात साठवले.
आई बंगल्याचं सारवलेलं आंगण तर मला विशेष भावलं. तुळशी वृंदावन, नाजुकशी रांगोळी, पडवीतला छोटा झोपाळा. आपल्या जगण्यातली हरवलेली निरागसता इथे गवसली.
आम्ही दोन रात्री तीन दिवस असे रहाणार होतो. तसा वेळ कमी होता पण वेळेचे नियोजन उत्तम केलं आणि बरीच प्रेक्षणीय स्थळे पाहू शकलो. हेदवीतला दशभूजा लक्ष्मी गणेश पाच मिनिटे अंतरावर तर बीच दहा मिनिटे अंतरावर होता हेदवी बीच वरील बामणघळ पाहिली.
एका संपूर्ण दिवसात गणपतीपुळे, प्राचीन कोकण , जयगड जय विनायक मंदिर, कराटेश्वर पुरातन शंकराचे देऊळ, आरे वारे बीच आणि मालगुंड येथील कृष्णाजी केशव दामले यांचे केशवसुत स्मारक ही सर्व स्थळे पाहिली.
ज्या दिवशी मुंबईला जायला परत निघालो तेंव्हा हेदवी चिपळूण या प्रवासात मधे थांबून, वेळणेश्वर बीच आणि गुहागर बीच तसेच गुहागर बाजार आणि व्याडेश्वर देवस्थान या ठिकाणांना पण धावती भेट दिली.
बंगल्यावर स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी जेवण व नाश्त्याची सोय झाली होती. पण कोकणात आलो आणि मासे खाल्ले नाहीत हे आमच्यातल्या मांसाहारी मंडळीना कसं चालणार? त्याची सोयही जवळच्याच गावामध्ये संकल्प भोजनालयात झाली. जिथे जाऊन नॉनव्हेज चा मनमुराद आनंद घेतला. अत्यंत चविष्ट, पारंपारीक, स्वच्छ, कोकणी घरगुती पद्धतीचे नॉनव्हेज तिथे मिळते.
अेक महत्वाची गोष्ट म्हणजे, आई बंगला प्रॉपर्टीवर मद्यपान किंवा मांसाहार करण्याची परवानगी नाही.
इथून निघताना मात्र मन उदास झालं. दोन दिवसात आपलंस वाटलेल्या या घरावरून प्रेमाने नजर फिरवावी असं वाटलं. या बंगल्याच्या नावाची पाटी खूप अर्थपूर्ण आहे. ती पुन्हा वाचली आणि मन भरून आलं. या पाटीवर ‘आ’ या अक्षरा खाली छोट्या अक्षरात लिहिलय “आत्मा” आणि ‘ई’ या अक्षरा खाली लिहिलय “ईश्वर”! हे जे लिहिलय त्याची अनुभूती आली होती. गाडीत बसण्या आधी मी तुळशीला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि “आई बंगल्यालाही”! माझे डोळे पाणावले होते….
मला जे वाटलं, मी जे अनुभवलं ते अगदी मनापासून लिहिलय. कसं वाटलं त्याचा अभिप्राय दिलात तर मला आवडेल.
तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर वेबसाईटवर संपर्क साधू शकता आई बंगलोज डॉट कॉम किंवा फोन नंबर श्री शेखर जोगळेकर, 9321892613
चारुलता काळे
9821806827
🙏